Monday, September 11, 2006

पहिला दिवस. बी ई चा रिझल्ट!

जुलै १९९८, शुक्रवार असावा. आता तारीख लक्षात नाही.

मी त्या दिवशी अ‍न्धेरीला होतो - चलम काकांकडे! आय आय टी मध्यॆ नूकताच जॉइन झालो होतो. खूप खूश होतो पण कूठेतरी मनात बी ई चा रिझल्ट जास्त महत्वाचा वाटत होता. ४ वर्षे त्या लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स, ओरल्स, सबमिशन, पी एल, परीक्षा ह्या काहीशा न संपणाऱ्य़ा चरकातून पिळून निघालो होतो. त्याचा एकुणच शेवट चांगला की वाईट ह्याकडे माझे लक्ष लागुन राहिले होते!
आणि कितीही म्हटलं तरीही शेवटी बी ई चा रिझल्ट आयुष्यभर 'रिझ्यूमे' वर वागवावा लागणार ही कल्पना होतीच. त्यात परत इंटर्विह्यूचा विचार आला की first impression is your last impression ही ओळ सारखी आठवायची. त्यामूळे बी ई चा रिझल्ट चांगला येवो अशी माझी देवाला प्रार्थना चालली होती (मनातल्या मनात :-) )! पण आमच्या आधीच्या बॅचचा रिझल्ट युनिवर्सिटीने चांगलाच लांबवला होता त्यामुळे आमच्या बॅचचा रिझल्ट सप्टेम्बर पर्यंत तरी अपेक्षित नव्हता! आणि म्हणुनच मी निवांत होतो! :-)

वीकेण्डला चलम काकू खूप दिवसांपासुन सांगत होत्या म्हणुन त्यांच्याकडे गेलो होतो. काही विशेष प्लॅन नव्हता. टी वी बघत काकुंशी गप्पा मारत होतो! ताईपण मुंबईत असते. वीकेण्डला ती वाट पाहील म्हणुन तिला मात्र फोन करुन सांगुन मी पवईवरून निघालो होतो. तेव्हा माझ्याकडे ना मोबाईल ना पेजर! म्हटले आपण जायचो मस्त वीकेण्ड एन्जॉय करायला आणि बाकी मंडळी इकडॆ चिंतेत - तसे नको!

चलम काका आणि काकू मूळचे तमिळ. काकू तर मद्रास दूरदर्शनवरून बातम्या देत! लग्नाआधी. काका आणि काकू महाराष्ट्रात आले नोकरीनिमित्त. काका विद्यूत मंड्ळात जॉइन झाले आणि कन्याकुमारी आणि मद्रास सोडून ते दोघेही इकडे आले - कुठे? तर चांदवड्ला. तालुक्याचा गाव. जिल्हा नासिक. माझं जन्मगाव. माझे वडील काकांचे सिनियर आणि English बोलू शकणारे जे काही थोडे लोक अशा गावी सापड्तील त्यापैकी एक. काका-काकू आले तेव्हा (ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला) माझ्या आईने आणि पप्पांनी ह्या दोघांना अगदी लहान भावा-वहीनीला करावी तशी मदत केली असं काकू आजही आवर्जून सांगतात. तेव्हापासून त्यांच्याशी जे संबंध जूळले ते आजतागायत.

इथे इतकी वर्षे राहिल्यानंतर दोघेही अस्खलित मराठी बोलायला शिकलेत. त्यांची मुलगी - नित्या - तर इथेच जन्मली. इथेच वाढ्ली. तिला मराठी जास्त आपली वाटते असं तीच सांगते! साने गुरूजींच्या गोष्टींचा एक सेट माझ्या ताईने तिला एकदा वाढ्दिवसाला गिफ़्ट म्हणुन दिला होता. ती अजुन नाव काढ्ते आणि त्या गोष्टी वाचुन नित्या रडायची असं काकू सांगतात. नित्या तर भाषांच्या बाबतीत अगदी ब्रिलियंट आहॆ. तमिळ तर तिला येतेच. मराठी - हिन्दी - ईंग्लिश ती शाळेत शिकली. आणि तिला मलयालम सुद्धा येतं. एकुण ५ भाषा!

तर त्या दिवशी रात्री आठचा सुमार असेल. काका नुकतेच परत आले होते. त्यांचे ऑफ़िस चर्चगेटला. रोज पीक टाईमला लोकल. थकून आले होते! आम्ही अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारतोय आणि फ़ोन वाजला. मी गप्प झालो. काका फ़ोन घ्यायला गेले. इकडे मी टी वी मध्ये डोके खुपसले.

"बालू, तुझा फ़ोन!" काका.

मला जरा आश्चर्यच वाट्लं. माझा फ़ोन? काकांकडे??

"कोण?" मी फ़ोनकडे जात प्रश्न केला.

"संगीता." माझ्या हातात रिसीव्हर देत काका म्हणाले.

"हं, बोल ताई." मी.

"अरॆ तुझा मित्र - पाण्डे - त्याचा फ़ोन आला होता. तुला फ़ोन करायला सांगितलाय. काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय असं म्हणत होता." ताई.

"बरं. मी करतो फ़ोन." 'काय महत्त्वाचे बोलायचं असेल ह्याला आता' असा विचार करत मी फ़ोन ठेवला. पण पाण्डे साहेबांचा(!) फ़ोन म्हणजे कॉल करायलाच हवा.

काकांना सांगुन मी फ़ोन करायला बाहेर पडलो. (अगदी १९९८ सालापर्यंत मुंबईवरून महाराष्ट्रात इतर ठिकाणी फ़ोन करायला STD लागायचा. काळ किती पट्कन बदलतो, नाही?)
अंधेरीला काका-काकू तेव्हा जिथे राहायचे तो लोखंड्वालाचा एरिया अगदी हाय-फ़ाय आहे. निऑन साइन्स, मर्सिडिझ, फ़िल्मी सितारे, टीवी पर्सनालिटिज, इंडस्ट्रियालिस्ट्स अशी सगळी मंडळी इथे राहतात. तिथे मी मॉल सगळ्यात आधी पाहिलीत. तेव्हा माझ्या मिड्लक्लास मनाला खुप आश्चर्य वाटलं होतं की दुकानदार त्याच्या सगळ्या मालाला गिर्हाइकाला हात कसा काय लावू देतो म्हणुन! आता आठ्वलं की हसु येतं.

पान्डे कधी नव्हे ते सन्ध्याकाळी घरी भेटला.

"अरे, उंडारायला नाही गेलास आज?" असा अगदी तोंडावर आलेला प्रश्न मागे सारत, "बोला साहेब, काय एवढं महत्त्वाचं काम काढ्लं पामराकडे?" असा मिळमिळीत प्रश्न मी त्याला विचारला.

"बाब्या, च्यायला कुठे उंडारत फ़िर्तो रे? लै ट्राय केला राव तुला आज? हायेस कुठं?" असा माझ्यावरच उखडत एकदम माझा डायलॉग ह्याने मलाच मारला!

"आपला रिझल्ट आला ना राव!" मला बोलायची संधी न देता पाण्डे एकदम एक्साईट होऊन सांगू लागला!

"काय? इतक्या लवकर??" पोटात आलेला गोळा, घश्याला पडलेली कोरड आणि एकदम आता तोल जाईल की तेव्हा असं वाटायला लावणारे गुड्घे असं सगळं एकाच वेळी सावरत मी.

"मंग! आपली बॅच लै भारीये सांगतो ना मी तुला." विशालच्या आवाजातली एनर्जी मला जाणवली! रिझल्ट बहुधा चांगला आलेला दिसतोय अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली!

"अरे भा... बोल की मग पट्कन!" आता माझा पेशन्स संपत आला होता.

"काय आलाय रिझल्ट? फ़र्स्टक्लास आला ना तूला?" मी विचारलं.

पाण्डे आणि मी इंजिनिअरिंगची शेवटची ३ वर्षे सतत सोबत असू. आमची जोडी जरा ऑड्च म्हणायची. पाण्डे म्हणजे एक हॅपी-गो-लकी, कुणाला काय वाटेल ह्याची पर्वा न करता बोलणारा, बस कंड्क्टरपासून तर कॉलेजच्या प्रोफ़ेसरपर्यंत सगळ्यांना एकाच स्टाइलने, "लै झालं, द्या डबल!" नाही तर "जाऊ द्या ओ सर... करा साइन आता!" म्हणणारा आणि मी आपला आपल्याच तन्द्रीत काहीबाही करत बसणारा - पेपर वाच. डुलकी काढ. चित्र काढ. - आणि त्यावरुन हा नेहमी माझ्यावर वैतागणार आणि डाफ़रणार "ए, आण रे त्या बाब्याला उचलून इकडे... ते येडं बसलंय तिथे वाचत!"

तरी आम्ही कायम सोबत असू. लेक्चरला, जेवायला, बसमध्ये. सुरूवातीला पाण्डे म्हणजे मला एक मॅनरलेस आणि गावंढळ कॅरेक्टर वाटलं होतं. (भागो!!!) त्याच्या सोबत राहुन हळुहळु त्याचे गुण कळले. हा पठ्या मॅथ्स मध्ये ब्रिलियंट. ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली. मेहनती. नितळ आणि नि:स्वार्थी स्वभाव. कधी एखादी असाइन्मेन्ट आधी पुर्ण केली किंवा कुणाचे जर्नल आणले लिहायला की मला आणुन देणार. "बाबा, हे घे. च्यायला तुझ्या जर्नलची काळजीबी मालाच. तु लिही आधी. मी घेऊन जाईल उद्या परवा! हरवू नको!" अशी तंबीपण देऊन जाणार. हे सगळं न सांगता, न मागता! ३ वर्षात ह्या फ़णसाचा गोडवा मनसोक्त अनुभवला! आधी खडबडीत वाटलेला हा माणुस इतका "सही" असेल असं स्वप्नातसुद्धा वाट्लं नव्हतं.

आणि हाच पाण्डे आता फ़ोनच्या दुसर्या टोकाला होता. त्या ३ वर्षाच्या सोबतीचा शेवटचा रिझल्ट घेउन!

"मिळाला ना! ६३%!" पाण्डे बोलला. "डिस्टिंक्शन थोडक्यात गेलं राव!" पाण्डेच्या आनंदाला एक ओवरअचिव न केल्याची किनार होती!
"आयला विशाल, फ़र्स्टक्लास आलाय तुला! कॉन्ग्रॅट्स!!" मी त्याला क्लास मिळाल्याबद्दल खरंच खुश झालो होतो. He Deserved it!
"आणि माझा रिझल्ट काय आलाय?" कपाळावरचा घाम पुसत मी विचारलं. I was sure everyone around there could hear my heartbeat!

"बाब्या पार्टी पाहिजे पार्टी! भाड्या तुला डिस्टिंक्शन मिळालंय!!" पाण्डेने एकदम ग्रॅण्ड स्टाइलमध्ये अनाउन्स्मेण्ट केली!

"काय??" माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता!

फ़र्स्ट सेम ला मला जेमतेम फ़र्स्टक्लास होता. खरंतर एक मार्क कमीच. म्हणजे माझा फ़ायनल सेमचा रिझल्ट फ़ण्डू आला असणार ह्यात वादच नव्हता. खरं म्हणजे मला अपे़क्षा होती पण मी स्वतःसोबत सुद्धा कधी कबूल केले नव्हते की कदाचित ह्या वर्षी डिस्टि येइल म्हणुन. टार्गेट तेच होतं पण जमेल ह्याची शाश्वती नव्हती. मेहनत केली होती पण फ़ळाची अपेक्षा नव्हती. आणि आज अचानक आऊट ऑफ़ द ब्लु रिझल्ट आला होता. ज्याची स्वप्नं ४ वर्षे बघितली तो ड्रीम रिझल्ट अगदी हवा तेव्हाच आला होता! Final year ला! आता माझ्या बी ई च्या certificate वर "First Class with Distinction" चा बोर्ड लागणार होता!

त्या रात्रीची ए़क्साइट्मेण्ट मी लाइफ़मध्ये कधीच विसरणार नाही. मी एक कवितासुद्धा लिहिली होती त्या रात्री. अभिजितला दिली होती वाचायला. काय होती ते आता अजिबातच लक्षात नाही पण ती ए़क्साइट्मेण्ट आजही ताजी आहे! ह्या एका रिझल्ट्ने मला जबरदस्त confidence दिला. पुढे कधीही "लढायला" मी घाबरलो नाही. विजयाची धुंदी किती "खास" असते त्याचा हा एक
आगळा अनुभव होता!

FIRST CLASS WITH DISTINCTION!

आजसुद्धा resume लिहिताना तो क्षण आठवतो तेव्हा एक शिरशिरी जाते अंगातून. आठवणी ताज्या होतात आणि लढायची जिद्द मिळते! AMAZING!!

7 Comments:

Blogger Abhijit Bathe said...

ultimate baba - ultimate.
tu marathit saakshar zaalaas tyaabaddal khaas abhinandan!

Monday, September 11, 2006 6:00:00 am  
Blogger सर्किट said...

khaas!! masta lihilayes baba.. Generally I avoid to go in the forests of memories, but this was a good refreshing nostalgia! ;) woh dinn firse yaad aa gaye.. Vishal la pathav tuzya hya post chi link ;).. our batch was really good.. and what was better than our results was the fact that we collected Gems like friends from PREC to preserve for the complete life!
3 cheers 2 our group's friendship!!! :-*

Monday, September 11, 2006 8:35:00 am  
Blogger सर्किट said...

Another good thing abt our group was that we all were BOYZ, and there wasn't a single GAL in our group! I donno why, but somehow I always feel good abt it! ;)

Monday, September 11, 2006 8:36:00 am  
Blogger Abhijit Bathe said...

he kaay nawin abhya!

Monday, September 11, 2006 2:02:00 pm  
Blogger सर्किट said...

जर ग्रूप मधे पोरगी असती, तर कुणीतरी कुणावर तरी ग्रुप मधेच लाइन मारायला लागलं असतं. आणि दोस्ती च्या रिलेशन्स चं वाटोळं झालं असतं.. तू आणि कळ्या आमच्या ग्रुप चा अभिन्न भाग होते (तू अजुनही आहेस, टचवूड).. प्लीज डोण्ट माइण्ड, पण बॅकग्राउण्डला तुमच्या बॅचचाही एक ग्रूप होताच की.. त्यात पोरींचा फ़ॅक्टर आल्याने कितीदा किती लोचे झाले, आठवून बघ! आय बेट की आपला ग्रुप तुमच्या त्या ग्रुप पेक्षा आजही जास्त रसरशीत आहे!

Monday, September 11, 2006 4:41:00 pm  
Blogger Abhijit Bathe said...

well - ya, I have to agree that we are still thriving. but I would say that - that group was doomed from start. Honestly, I had no business being there apart from Kalya - who is still a good friend, and amazingly it worked out very well between me and parya. But to blame 'a girl'.....maybe.
You know what - I agree.

Tuesday, September 12, 2006 1:58:00 pm  
Blogger सर्किट said...

बाब्या, आता द्या डबल!... म्हणजे, पुढचा पोस्ट लिही!

Wednesday, September 20, 2006 9:37:00 am  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home