भारत यात्रा
आताच भारतातून परत आलो. वर्षानंतर भारतात जायला मिळतं तेव्हाचा आनंद काही औरच! फ़ोनवर कितीही गप्पा मारल्या तरीही घरच्या सगळ्यांना भेटून बोलण्यातला आनंद फ़ोनवर नाही मिळत! फ़ोन करुन मला तर अनेकदा हूरहूर लागते. उदास व्हायला होतं. वाटतं उगाच फ़ोन केला - चांगला रूळलो होतो - आता परत आठवण! हळुहळू सवय होउन जाते. मग आठवडाभर काम आणि वीकेंडला फ़ोन करायचं रूटिन अंगवळणी पडून जातं.
पण ह्या पोस्ट्चा विषय फ़ोन आणि आठवणी नाहीच!
दर वेळी भारतात जायचं म्हटलं की घरच्यांना भेटायची, मित्रांना भेटायची उत्सुकता असते. ह्या वेळी खूप जास्त उत्सुक होतो जायला तो वेगळ्याच कारणांसाठी.
पहिलं कारण म्हणजे - गेल्या वर्षात आमच्या घरात ऍड झालेली एक नवी मेंबर. माझी मुलगी - अनन्या. तिचा जन्म इथेच झाला. घरच्या सगळ्यांना इकडे येणं शक्य नव्हतं आणि तिला खूप लहानपणी न्यायची आमची इच्छा नव्हती. तान्ही बाळं खूपच नाजूक असतात आणि खूप demanding सुद्धा! तिला एवढ्या दूर न्यायचं तर तिचे हाल आणि तिच्या आईचेही! आता ती बर्यापैकी मोठी झालिये तर म्हटलं जाउन यावं. आजी, आजोबा, काका, मामा मंडळीना जरा खेळु देत. नाही तर चालायला लागेल, बोलायला लागेल आणि आपल्या घरातलं बाळ आपल्या नजरेआड इतकं मोठं होउन गेलं आणि आपल्याला तिचे लाड करायला मिळालेच नाहीत अशी त्यांना हूरहूर!
आणि ती चिमूरडीपण कुठे कमीये? तिला पण भरपूर माणसं लागतात! भारतात राहिलो महिनाभर तर सगळ्यांकडे जायला तयार - अगदी अनोळखी माणसांकडे सुद्धा! सगळ्यांना तोंडभरून smile देणार. बघणारा खूश. परत मॅडम त्यांच्याकडे झेप घेणार हसत हसत. समोरचा आधीच खुश झालेला, बाळ आपल्याकडे यायला मागतंय म्हटलं की त्यांना तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होउन जायचं! त्यामुळे माझी आणि शुभांगीची baby sitting duty वरून जवळ जवळ उचलबांगडीच झाली! अर्थात आम्हालाही तो एक welcome break होता म्हणा! पोरीचा कंटाळा अजिबात नाही आला पण दिवसभर एकट्याने बाळाला सांभाळणं आणि चार जणांनी थोडा हातभार लावणं ह्यात खूप फ़रक पडतो! एकट्या माणसाची मानपाठ एक होउन जाते. It's fun but very tiring. थोडा विसावा ममा-पपाला पण हवाच असतो! :-)
दूसरं कारण म्हणजे - गेल्या वर्षात आमच्या family त ऍड झालेलं नवं घर! :-)
लग्नानंतर मी आणि शुभांगीने सहा महिने जवळ जवळ प्रत्येक वीकेंड्ला आख्खं पुणं पालथं घातलं. एक कलमी कार्यक्रम - घर शोधणे! आम्ही दोघेही पुण्यात नवे. रस्ते माहित नसत. आपली ऍक्टिवा काढायची. एक कुठला तरी रस्ता पकडायचा. कूठे कूठे कंस्ट्रक्शन चालु आहे बघत निघायचं! एखाद्या ठिकाणी चांगला प्रोजेक्ट दिसला कि गाडी लावायची, साईट ऑफ़िस शोधायचं आणि सगळी माहिती काढायची. बिल्डर लोकांच्या a/c ऑफ़िसमध्ये बसुन brochure बघुन घरं सिलेक्ट करण्यापेक्षा स्वत: घर शोधुन अशी माहिती काढणं आम्हाला दोघांना आवडायचं! एक तर पुण्याची माहिती व्हायची. आम्हाला पुण्याची जेवढी माहिती असं फ़िरुन झाली तेवढी अन्यथा कधीच झाली नसती. परत बिल्डर लोकांची घर विकायची पद्धत काहीवेळा आम्हाला पटत नसे. Brochure मध्ये लिहिलेलं असणार की अमुक रोडवर साइट आहे. प्रत्यक्ष जाउन बघितलं की त्या रोडवरच्या कुठल्या तरी offroad वर अर्धा एक किलोमिटर आतमध्ये साइट. घर बघायच्या आतच आमचा मूड ऑफ़ झालेला असे. एवढ्या रणरणत्या उन्हात भर दूपारी असा पोपट झाला की आम्ही जाम वैतागायचो! एक तर ऊन. दुसरं म्हणजे बहुतेक construction चालु असलेले विभाग आमच्या घरापासुन १५ किमी दूर. इतक्या दूर जाउन असल्या कोपर्यातली घरं बघायचा अजिबात मूड नसायचा.
पण अश्या गोष्टीमधुन आम्ही बरंच काही शिकलो! एक तर बिल्डर लोकांना 'योग्य प्रश्न' विचारायचे. घरुन निघण्याआधीच विचारुन घ्यायचं मेन रोड पासुन साइट किती 'आत' आहे? त्याने सांगितलं २ मिनिटाच्या अंतरावर आहे कि समजायचं अर्धा किमी तरी आहे. त्याने सांगितलं की ५-१० मिनटांवर आहे तर सरळ Ditch. बिल्डर म्हणतो १० मिनिट म्हणजे त्याची साइट ऍड केलेल्या रोडवर जवळ्जवळ नसतेच! आणि साइट रोड्वर अगदी दर्शनी भागात असेल तर तुम्ही तिकडुन जाताना तुम्हाला ती दिसतेच!
आमचं रूटिन ठरलेलं असे. घरून निघताना ऍक्टिवाचा किमी काऊण्टर नोट करून घ्यायचो. आणि परत एखाद्या लॅण्ड्मार्कपासुन सुद्धा अंतर मोजायचा प्रयत्न करायचा. For example, पाषाणकडे घर बघायला जाताना युनिवर्सिटी सर्कल पासुन शक्यतो अंतर मोजायचं!
असेच एकदा बाणेर रोड वरुन आम्ही एक साइट शोधत जात होतो आणि आम्हाला अगदी रस्त्यावरच दूसरी एक साइट दिसली. त्यातली एक १० मजली इमारत जवळजवळ पुर्ण झाली होती आणि अजुन एक बिल्डिंग बनत होती....
मला माहित आहे की अभ्या, ऍश ही मंडळी मला शिव्या घालणार आहे म्हणुन पण... रात्रीचे अडीच वाजलेत आणि उद्या मला "पहाटे पहाटे" १० वाजता उठावं लागणार आहे. सध्या इथेही माझं घर संशोधन चालु आहे. त्याची १२ ला appointment आहे. आता झोपलंच पाहिजे! :-) बाकी नंतर...
(क्रमश:)