Wednesday, April 18, 2007

लेक डिस्ट्रिक्ट

काही दिवसांपुर्वी अचानक मी काम करत असलेला प्रोजेक्ट आमच्या क्लायंट कंपनीने तडकाफ़डकी बंद करुन टाकला. कारण? कॉस्ट कटिंग. त्याचा एक परिणाम म्हणुन मी अचानक खूप बिझीचा बेकार झालो! अर्थात माझ्या ट्रिपचं आधी प्लॅनिंग आणि आता वर्णन करायला मोकळा! :-)

योगायोगाने हे घडलं आणि लगेचच इस्टर वीकेंड आला. तसा आमचा वीकेंडचा प्लान आधीच ठरला होता - लेक डिस्ट्रिक्ट!

मला आता युकेला येउन बरीच वर्षे झालीत. पण फ़िरायला म्हणुन मी युकेमध्ये क्वचितच गेलोय. बहुतेक फ़िरणं झालंय ते कामासाठी - त्यातही बहुतेक मीटिंग्स लंडनमध्येच असतात. ह्या देशाच्या नकाशात लंडन अगदी दक्षिण-पुर्व कोपर्यात दिसत असलं तरी इथलं सगळं रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं लंडनला एकत्र येतं. लंडनच्या भोवती M25 नावाचा एक रिंगरोड हायवे आहे. त्याच्या वेगवेगळ्या कोप-यातुन वेगवेगळे मोटरवेज सर्व दिशांना जातात. त्यातला एक महत्वाचा रस्ता - M1.

हा रस्ता मिल्टन कीन्सच्या (माझं गाव) जवळुन सरळ उत्तरेला स्कॉटलंडला जातो. जसजसे आपण उत्तरेला जाउ लागतो तसतसं ब्रिटनचं हे जगातलं आठवं सगळ्यात मोठं बेट निमुळतं होत जातं. बाहेरच्या जगात, विशेषत: भारतात, ह्या देशाच्या राजकीय आणि भौगोलिक रचनेबद्दल एकूणच माहितीचा अभाव जाणवतो. ह्या बाबतीत मला विशेषत: भारताचं आश्चर्य वाटतं कारण नाही म्हटलं तरी आपला २ शतकांचा 'घरोबा'! इतकी वर्षे एकमेकांच्या संपर्कात असुनही ब्रिटनच्या ह्या बेटावर एकूण तीन 'देश' आहेत ही माहिती फ़ार कमी जणांना असते असा माझा अनुभव आहे. हे तीन देश - इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड - म्हणजे ग्रेट ब्रिटन. आणि ग्रेट ब्रिटन अधिक उत्तर आयर्लंड म्हणजे युके अर्थात युनायटेड किंग्डम. ह्या देशाचं खरं नाव सुद्धा United Kingdom of Great Britain and Northern Ireland असं लांबलचक आहे! भारतामध्ये लोक 'इंग्लंड', 'ग्रेट ब्रिटन' आणि 'युके' हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरताना मी पाहिलंय! असो.

तर मी सांगत होतो की M1 मिल्टन कीन्सच्या जवळुन सरळ उत्तरेला स्कॉटलंडला जातो. उत्तरेला मध्येच एका भागात ह्या बेटाची रुन्दी बरीच कमी होते. तिथे मग अनेक शहरांचं जाळं आहे - मॅन्चेस्टर, लिवरपूल, न्युकासल, ब्लॅकपूल, लॅन्कास्टर, केण्डाल, ब्रॅड्फ़र्ड, लीड्स, शेफ़िल्ड, यॉर्क, नॉटिंघम आणि बरीच छोटी मोठी शहरं ह्या भागात दाटीवाटिने वसलियेत. लंडन पाठोपाठचा ह्या देशातला सगळ्यात जास्त संपन्न प्रदेश हाच असावा.

ह्या अनेक शहरांचं हे जाळं ओलांडलं की येणारा डोंगराळ प्रदेश म्हणजे कम्ब्रिया. हाच लेक डिस्ट्रिक्ट!
प्रुथ्वी (प्रुथ्वीमधला रु उच्चार असलेला "खालचा अर्धचंद्र" बरहा मध्ये कसा लिहायचा माहित असेल तर कुणी सांगाल का प्लीज? धन्यवाद.) वरच्या शेवटच्या हिमयुगात ह्या डोंगराळ प्रदेशात ब-याच हिमनद्या तयार झाल्या होत्या. त्या हिमनद्यांनी हजारो वर्षांच्या कालावधीत हा भाग अक्षरश: पोखरुन काढला. असाच पराक्रम हिमनद्यांनी जगात इतरत्रही केलाय - नॉर्वे/स्कॉटलंडचा दन्तुर किनारा काय किंवा कॅनडाच्या उत्तर भागातल्या बेटांचा किनारा काय - ही सगळी ह्याच हिमनद्यांची किमया!

पुढे तापमान वाढलं. हा सगळा बर्फ़ वितळला पण ह्या नद्यांनी पोखरून काढलेल्या ह्या चिंचोळ्या आणि लांबच लांब खोलगट भागात इथे अनेक तळी तयार झाली. विन्दरमिअर, उल्सवॉटर आणि बरीच छोटीमोठी इतर!

स्कॉटलंडमधलं इन्वरनेस तळं सुद्धा अशाच एका हिमनदीने बनवलंय. तिथेही जायचा प्लॅन गेले बरेच दिवस करतोय पण अजुन मुहुर्त लागत नाहिये. नॉर्वेमधली जगप्रसिद्ध फ़ियॉर्द्स (fjords) देखिल अशीच बनली आहेत. नॉर्वेमध्ये त्यांचं रूप मात्र वेगळंच असल्याचं वाचलंय कारण किना-यावरचा बराचसा प्रदेश डोंगराळ आहे आणि ही फ़ियॉर्द्स खूप खोल आणि रुंद आहेत. ही ट्रिप मात्र अनन्या मोठी झाल्यावर. :-)
लेक डिस्ट्रिक्टला गेलो आणि पहिल्यांदाच युरोपात असुनही केरळ किंवा कोंकणात कुठेतरी गेल्यासारखं वाटत राहिलं. तीच दाट झाडी. तेच चिंचोळे आणि नागमोडी रस्ते. डोंगर. द-या. फ़क्त घाम नव्हता! पण सह्याद्रीचा थाट काही न्याराच! सह्याद्रीचे सरळ उभे कडे, काळा कुळकुळीत कातळ, त्याचं ते रौद्र रूप बघितलेल्या माणसाला इथले उंच पण दिसायला टेकडीसारखे डोंगर वेगळेच वाटतात. त्यातही एका विशिष्ट उंचीच्यावर ह्या डोंगरांवर एक गवताची काडीही उगवत नाहीसं दिसलं! इतके उंच आणि ओसाड डोंगर बघायला कसंसंच वाटत होतं. द-यांमध्ये मात्र सुंदर दाट हिरवाई. आजुबाजुला अध्येमध्ये धबधबे. आणि खोलवर खाली निळंशार पाणी - तळ्याचं पण एखाद्या अजस्त्र नदीसारखं वाटणारं.

विंदरमिअर आणि उल्सवॉटर मात्र सुरेख! इथे सगळीकडे तळ्यात आणि नद्यांमध्ये हंस असतात. संपुर्ण पाण्याला ह्या सुंदर पक्ष्यांनी एक वेगळीच शोभा येते. निळंशार स्वच्छ पाणी आणि हिरवागार किनारा. त्यात अध्ये मध्ये कुठेकुठे टुमदार दुमजली घरं. पाण्यात अधुन मधुन सुंदर शिडांच्या बोटी! क्लास!

पावसानेही छान साथ दिली. कुठेही दर्शन दिलं नाही.

आमचं होस्टेल अशाच एका दरीत एका सुंदर आणि निवांत जागेवर होतं. मस्त जागा होती. एकाबाजुला उंचच उंच डोंगर (पर्वत शब्द वापरावासा वाटत नाही - हिमालय आणि सह्याद्रीनंतर हा शब्द मला वाटतं फ़क्त रॉकिज आणि ऍन्डिजना शोभुन दिसेल!) आणि दुसर्या बाजुला खोल हिरवीगार दरी आणि दुरवर दिसणारा विंदरमिअरचा किनारा. सुरेख लोकेशन होतं.

४ दिवस कुठे गेले कळलंच नाही!

चार दिवसात रिफ़्रेश होउन कालच परत आलो.

काही फोटो पिकासा (गुगलचं हे आणखी एक पिल्लु. नेहमीप्रमाणे फ़ुकट. ;-) छान आहे. वापरुन बघा.) वर टाकलेत.

http://picasaweb.google.co.uk/himanshu.thakur/LakeDistrict

अनन्याने सुद्धा भरपुर एन्जॉय केली ट्रिप! आजकाल मॅडम जाम demanding झाल्यात. आणि खोडकर सुद्धा! कधी काय उद्योग करेल नेम नसतो. पण सगळ्यांना बघुन स्माइल देणार - ओळख असो कि नसो! काही बडबड्गीतं शुभांगीने तिला शिकवुन ठेवलियेत - इथे इथे नाच रे मोरा, व्हील्स ऑन द बस गो राउंड ऍण्ड राउंड, मछली जल की रानी हैं वगैरे. छान प्रतिसाद देते. सतत काहीतरी खोडया चालु असल्या तरी (किंवा म्हणुनच) आजकाल तिच्याशिवाय अजिबात करमत नाही!

I am enjoying being a father more than ever now. Its fun!